अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे कनिष्ठ अभियंत्यांना निर्देश
पैठण, (प्रतिनिधी) पैठण ते शेवगाव रोडवर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अपघात प्रवण स्थळांची (Black Spots) संयुक्त पाहणी करण्यात आली.
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पैठण) कनिष्ठ अभियंता शिंदे आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रशासकीय पथकाने पैठण शहर परिसरासह गावांमधील मुख्य वळणे आणि धोकादायक ठिकाणांची बारकाईने पाहणी केली:
पैठण शहर (प्रॉपर),पाटेगाव,चनकवाडी,तेलवाडी, सोनवाडी शिवार याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पाहणी दरम्यान रस्त्यावरील त्रुटी, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि धोकादायक वळणे यावर चर्चा करण्यात आली.पोलीस निरीक्षक गोमारे व आनंद झोटे यांनी अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुधारणांबाबत कनिष्ठ अभियंत्यांना स्थळावरच सूचना दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने रंबलर्स बसवणे, गतिरोधक,रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
तसेच या संदर्भात पोलीस विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्रव्यवहार करण्यात येत असून,तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करावे,असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.











